अहेरी (श.प्र.)
राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 आलापल्ली-सिरोंचा या मार्गावरील अवजड वाहतूक बंदीची मुदत 30 सप्टेंबर रोजी संपली आहे. मात्र अवजड वाहनावरील बंदी काही कालावधीसाठी कायम ठेवावी, असा एकमुखी ठराव सदर मार्गावरील जवळपास 20 ते 25 ग्रामंपचायतीने घेतला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या या ठरावाचा सन्मान करीत प्रशासनाने या मार्गावरील अवजड वाहन बंदीस तीन महिन्यांसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी जिल्हाधिका-यांना निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा-आलापल्ली या मार्गाची दैनावस्था लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी 1 जुलै रोजी आदेश निर्गमित करीत 30 सप्टेंबरपर्यंत या महामार्गावरील अवजड वाहतूकीस बंदी घातली होती. मात्र मुदत संपल्याने पुन्हा या मार्गावर अवजड वाहनांची रेलेचल वाढण्याची शक्यता आहे. सदर मार्गावरील दैनावस्थेमुळे नेहमीच वाहने फसणे, अपघात, शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना मनस्ताप ही नित्याची बाब झाली होती. मात्र जिल्हाधिका-यांच्या अजवड वाहन बंदीच्या आदेशामुळे काहीअंशी अन्य वाहतूकदारांसह या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र मुदत संपल्याने पुन्हा अवजड वाहनांची रेलचेल वाढून अपघाताची शक्यता बळावली आहे. रस्त्याच्या चाळणीमुळे या मार्गावर आधीच अनेकांचे प्राण गेले आहेत. तसेच गरोदर मातांना रुग्णवाहिकेद्वारे या मार्गावरुन नेणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे संभाव्य धोकादायक स्थिती लक्षात घेता या मार्गावरील गुडिगुड्डम, खांदला, राजाराम रेपनपल्ली, कमलापूर, वेडमपल्ली, जिमलगाट्टा, गोविंदगाव, उमानूर, मरपल्ली, रेगुलवाही, बामणी, मादाराम, टेकडा, रंगय्यापल्ली, अमराजी, किष्टापूर, कुंजर आदी जवळपास दोन डझनभर ग्रामपंचायतीसह सिरोंचा नगरपंचायतीने एकमताने ठराव पारित करीत सदर मार्गावरील अवजड वाहन बंदीस पुढील तीन महिन्यांपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी लावून धरली आहे.
सदर राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत येत असलेल्या गाववासीयांच्या एकमुखी मागणीचा सन्मान करीत या मार्गावरील अवजड वाहन बंदीस पुढील तीन महिन्यांपर्यंत मुदतवाढ द्यावी, राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे, महामार्गाचे कामकाज ज्या कारणामुळे ठप्प पडले आहेत, त्याचा शोध घेऊन बांधकाम तत्काळ सुरु करावे, अशी मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांचेद्वारे निवेदनातून केली आहे.






