*होड्री नाल्यावरील ‘बेली ब्रिज’ पूर्णत्वास येणार* *साहित्य पोहोचले, अतिदुर्गम भागातील वाट होणार सुकर*

81

साहित्य पोहोचले, अतिदुर्गम भागातील वाट होणार सुकर

लाहेरी : लाहेरीपासून दोन किमी अंतरावरील होड्री नाल्यावर बेली ब्रिजचे बांधकाम करण्यात येत आहे. एप्रिल महिन्यापर्यंत हे बांधकाम संथगतीने करण्यात येत होते. मात्र, आता पावसाळा ओसरताच ‘बेली ब्रिज’चे साहित्य बांधकाम स्थळी पोहोचविण्यात आले असून लवकरच हा पूल पूर्णत्वास येणार असल्याचे दिसून येते. या पुलामुळे अतिदुर्गम भागातील नागरिकांची वाट सुकर होणार आहे.
युती शासनाच्या काळात गडचिरोली जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर ७ बेली ब्रिजचे बांधकाम हाती घेण्या आले. यापैकी एटापल्ली, गडचिरोली व धानोरा तालुक्यातील बेली ब्रिजचे बांधकाम पूर्ण झाली आहेत. तर भामरागड तालुक्यातील होड्री नाल्यावरील बेली ब्रिजची नागरिकांना प्रतीक्षा होती. पावसाळ्यापूर्वी या पुलाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ते होऊ शकले नाही. त्यामुळे हा पूल कधी पूर्णत्वास येणार याकडे या भागातील नागरिकांचे लक्ष लागले होते. दरम्यान, गुरुवारी बेली ब्रिजच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे साहित्य पोहोचले आहे. त्यामुळे लवकरच हा बेली ब्रिज पूर्ण होणार असल्याचे दिसून येते. होड्री परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक साहित्यासह आरोग्यसेवेसाठी लाहेरीला यावे लागते. मात्र, होड्री नाल्यावर पूल नसल्याने हा प्रवास करताना जीव धोक्यात टाकावा लागत होता. ही बाब लक्षात घेता, तत्कालीन पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी बेली ब्रिजसाठी पुढाकार घेतला. होड्री नाल्यावरही बेली ब्रिज निर्माण करण्यासाठी कामाला सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान, बेली ब्रिज निर्माण करण्याच्या कामात पावसाळामुळे अडचण निर्माण झाली. त्यावेळी पावसाळ्यानंतरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती संबंधित यंत्रणेने दिली होती. त्या अनुषंगाने पावसाळा ओसरताच बेली ब्रिजचे साहित्य बांधकामस्थळी पोहोचविण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच बेली ब्रिज पूर्ण होणार आहे. या बेली ब्रिजमुळे होड्री परिसरातील लष्कर, गोपनार, धिरंगी, हलोदंडी, मोरडपार आदी गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.