भटपार परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात १५ एप्रिलपासून बेमुद्दत लक्षवेधी आंदोलन सुरू – भाकपा

202

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी, एटापल्ली

एटापल्ली : भामरागड तालुक्यातील भटपार परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था तसेच मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने दिनांक १५ एप्रिल २०२६ पासून बेमुद्दत लक्षवेधी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन उभारण्यात आले आहे.
या संदर्भात भामरागड येथील तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले असून, भटपार ते दर्भा तसेच भटपार ते घोटपाडी या मार्गांची अवस्था अत्यंत खराब झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे जंगलमार्ग पावसाळ्यात चिखलमय होऊन पूर्णपणे वाहतुकीस अयोग्य ठरतात. परिणामी, स्थानिक नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थी, रुग्ण आणि शेतकरी वर्गाला बसत आहे.
रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण मोठ्या प्रमाणात बाधित होत आहे. एसटी बस सेवा नियमित नसल्याने शाळा व महाविद्यालयात जाणे कठीण झाले आहे. तसेच आरोग्य सुविधाही प्रभावित होत असून, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेवर दवाखान्यात पोहोचवणे अवघड बनले आहे.
भाकपच्या वतीने प्रशासनावर तीव्र टीका करण्यात आली असून, मोठ्या कंपन्या व उद्योगांच्या कामांना प्राधान्य देताना सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारंवार मागण्या करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. सचिन मोतकुरवार (जिल्हा सहसचिव, भाकपा) यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, कॉ. सुरज जक्कुलवार, कॉ. विशाल पूजजलवार तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आंदोलन शांततामय पद्धतीने करण्यात येत असून, मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे:
१) भटपार ते दर्भा मार्गाचे पक्के डांबरीकरण तात्काळ मंजूर करून काम सुरू करावे.
२) भटपार ते घोटपाडी मार्गावर पावसाळ्यापूर्वी मुरुम रस्ता तयार करावा.
३) भटपार परिसरात नियमित एसटी बस सेवा सुरू करावी.
जोपर्यंत मागण्यांबाबत ठोस आश्वासन व मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा भाकपच्या वतीने देण्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने या प्रश्नांकडे लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.