अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी
एटापल्ली: तालुक्यातील उडेरा येथील आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीने धान खरेदी बंद केल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर व बैल बंडयामध्ये भरून आणलेले शेकडो क्विंटल धान खरेदी केंद्रावर गेली चार दिवसांपासून विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. सदरचे धान खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी अमर राऊत यांना शेतकऱ्यांनी ईमेल द्वारा पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
शेतकऱ्यांनी शेती हंगाम २०२५-२६ मध्ये पिकविलेल्या धानाची अजूनही विक्री झालेली नाही, आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी उडेराच्या परिसरातील ग्रामपंचायत उडेरा, बुर्गी, कांदोळी व येमली या चार ग्रामपंचायत क्षेत्रातील गावातील अनेक शेतकऱ्यांकडून आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी उडेराच्या खरेदी, विक्री केंद्रावर उत्पादीत धानाची विक्री केली जाते, शासनाच्या धोरणावरून यावर्षी ३१ मार्च २०२६ ही धान खरेदीची शेवटची तारीख जाहीर केली होती, त्यामुळे शेतकऱ्यांनी दिनांक ३० मार्च रोजी धान खरेदी केंद्र उडेरा येथे धान भरलेले ट्रॅक्टर व बैल बंडी घेऊन पोहचले आहेत, त्या दिवसापासून धान विक्री करण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टर व बैल गाड्या रांगेत उभ्या करून प्रतीक्षेत असतांना ३१ मार्च च्या दुपारी 3:00 वाजता सोसायटीने केंद्रावर धान खरेदी करणे बंद केले आहे. त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टर व बैल बंडयासह गेली चार दिवसांपासून उन्हाच्या तडाख्यात धान खरेदी केंद्रावर तात्काळत भर उन्हाच्या काहेलीत धान विक्रीच्या प्रतीक्षेत थांबून असल्याचे दिसून येत आहे.
सदरचे धान खरेदी केंद्र काही दिवस सुरु ठेवण्याची मागणी धान विक्रीच्या प्रतीक्षेतील सुक्कू आत्राम, अडवे वेलादी, विठ्ठल वाघाडे, विलास गावंडे, पुंडलिक खोब्रागडे, गोंगलू वेलदी व इतर विस शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी अमर राऊत यांना निवेदनातून केली आहे.







