अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी
एटापल्ली : जिवनगट्टा गावात होळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या “जेपीसीएल – जिवनगट्टा प्रीमियर क्रिकेट लीग” या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन दि. १ मार्च २०२६ रोजी सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. रंगपंचमीच्या सणाला क्रीडामय रंग देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे परिसरातील तरुणाईत विशेष उत्साह निर्माण झाला असून क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. हर्षवर्धन बाबा आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य अहेरी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगर पंचायत एटापल्लीच्या नगराध्यक्षा रेखाताई मोहुर्ले उपस्थित होत्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्षा पौर्णिमाताई श्रीरामवार, तालुका अध्यक्ष संभाजी हिचामी, माजी सभापती बेबीताई नरोटे, युवा नेतृत्व मनीष दुर्गे, नगरसेवक निर्मलाताई हिचामी, जांबिया येथील माजी सरपंच राजू नरोटे तसेच जिवनगट्टा गावचे पाटील आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून ग्रामीण भागातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. क्रीडा हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित करणारे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले. गावागावातील लपलेल्या गुणवंत खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजकांनी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वांनी कौतुक केले.
स्पर्धेचा अंतिम सामना दि. ७ मार्च २०२६ रोजी खेळविण्यात येणार असून विजेत्या संघाला तब्बल ४० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघासाठी ३० हजार रुपये तर तृतीय क्रमांकासाठी २० हजार रुपयांचे आकर्षक बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर यांनाही विशेष पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या स्पर्धेमुळे जिवनगट्टा परिसरात सणासुदीच्या वातावरणात क्रीडामय उत्साहाची भर पडली असून युवकांना सकारात्मक दिशेने प्रेरणा मिळत आहे. अंतिम सामन्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात क्रीडारसिक उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकूणच “जेपीसीएल – जिवनगट्टा प्रीमियर क्रिकेट लीग” ही स्पर्धा ग्रामीण भागातील क्रीडा चळवळीला नवे बळ देणारी ठरत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.







