नागपूर
नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या SBL बारूद कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून १५ जण जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राऊळगाव येथील SBL कंपनीत सकाळी सुमारे ७ वाजून १० मिनिटांनी पहिला स्फोट झाला. कंपनीमध्ये स्फोटके (बारूद) तयार करण्याचे काम सुरू असताना अचानक स्फोट होऊन त्यानंतर आग लागल्याचे सांगितले जात आहे. स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे आणि आत अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
या दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. कंपनीत काम करणारे बहुतांश कामगार आसपासच्या गावांतील असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राऊळगाव परिसर हा जंगलाचा परिसर असल्याने इथे अनेक स्फोटकं बनवणाऱ्या खासगी कंपन्या आहेत. हा बफर झोन असल्याने येथे फारशी वस्ती नाही.
आसपासच्या गावांतील नागरिक या कंपन्यांमध्ये काम करतात. स्फोटाचे मोठे आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी जमले असून या घटनेबाबत स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही प्रत्यक्षदर्शींनी पहिल्या स्फोटानंतर आणखी स्फोट झाल्याचे सांगितले आहे. या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून बचावकार्य सुरू आहे.
ब्युरो चीफ मंगेश उराडे न्युज 7 मराठी काटोल नागपूर







