विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा आविष्कार; एटापल्लीत मदरलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान महोत्सव साजरा

85

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली : एटापल्ली येथील मदरलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्या अंगी असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी, या उद्देशाने विविध विज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन आणि मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मॉडेल्स व प्रयोगांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाचे उद्घाटन एटापल्लीचे पोलिस निरीक्षक माननीय नागरगोजे साहेब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनीष दुर्गे तसेच पोलिस निरीक्षक मडावी साहेब उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध विज्ञान प्रयोगांचे बारकाईने निरीक्षण केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि सर्जनशीलतेचे कौतुक करत त्यांनी त्यांच्या प्रयत्नांचे अभिनंदन केले.

आपल्या मनोगतात नागरगोजे साहेब म्हणाले की, “आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकापुरते ज्ञान न ठेवता प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञान समजून घेतले पाहिजे.” त्यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन केले. तसेच मनीष दुर्गे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये दडलेली गुणवत्ता अधोरेखित करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून त्यांना संशोधनाची प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे प्राचार्य राजू झोडे, उपप्राचार्या सुनीता मॅडम तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेतील सोहेल शेख सर,मेघा मॅडम, करिना मॅडम, सुकन्या मॅडम, आरती मॅडम आणि राजकुमार सर यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प सादरीकरणासाठी मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक राजू झोडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले व अशा शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे सांगितले.

कार्यक्रमास पालकवर्ग व परिसरातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विज्ञान दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा आणि संशोधनाची आवड अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.