प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेत परसबाग स्पर्धेत कर्रेम शाळेचा तालुक्यात प्रथम क्रमांक

258

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत आयोजित परसबाग स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्रेम (केंद्र – एटापल्ली) हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेच्या या यशाबद्दल शैक्षणिक व प्रशासकीय स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या पार्श्वभूमीवर दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हास्तरीय समितीने शाळेला भेट दिली. माननीय वैभव बारेकर, उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या नेतृत्वाखालील पथकाने परसबागेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी भाजीपाला लागवड, फळबाग, फुलबाग तसेच शालेय परिसरातील स्वच्छता व नियोजनाची सविस्तर तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सहभागातून साकारलेली हिरवाई, सेंद्रिय पद्धतीने जोपासलेली पिके आणि देखभालीतील सातत्य पाहून समितीने समाधान व्यक्त केले.
पाहणीदरम्यान श्रीकृष्ण पेंदाम, सहायक गटविकास अधिकारी, पंचायत समिती एटापल्ली; कुनघाडकर, विस्तार अधिकारी (पंचायत विभाग); श्रीमती संध्या मोंढे, केंद्रप्रमुख कारवाफा; अशोक कोवे, गटसमन्वयक, गटसाधन केंद्र एटापल्ली; तसेच अनिल गजभे, विषय तज्ञ, गटसाधन केंद्र एटापल्ली आदी अधिकारी उपस्थित होते.
या परसबाग उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ऋषिकेश बुरडकर, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती एटापल्ली; दिनकर राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी; तसेच अरूणा बर्लावार, केंद्रप्रमुख एटापल्ली यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे शाळेचे मुख्याध्यापक कु. एल. एस. झोरे यांनी सांगितले.
शाळेने परसबागेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पोषण, स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा अभिनव उपक्रम राबविला असून, या यशामुळे संपूर्ण तालुक्यात शाळेचा गौरव होत आहे