अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी
एटापल्ली : क्रीडाप्रेमींच्या प्रचंड उपस्थितीत आणि अटीतटीच्या लढतींनी रंगलेल्या जिवनगट्टा येथील ‘राजे फॅन्स क्लब’ आयोजित भव्य सर्कल क्रिकेट स्पर्धेचा दिमाखदार समारोप नुकताच पार पडला. या स्पर्धेत उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत प्रणय क्रिकेट क्लब, एटापल्ली या संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले.
राजे फॅन्स क्लब, जीवनगट्टा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील तसेच परिसरातील अनेक नामांकित संघांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच प्रणय क्रिकेट क्लबने शिस्तबद्ध खेळ, योग्य रणनीती आणि अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आपली ताकद दाखवून दिली. प्रत्येक फेरीत प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करत त्यांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला.
अंतिम सामन्यात प्रणय क्रिकेट क्लबने प्रभावी गोलंदाजीसह आक्रमक फलंदाजी करत सामना आपल्या बाजूने वळवला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यातील थराराने प्रेक्षक अक्षरशः खिळून राहिले. अखेर उत्कृष्ट खेळाच्या बळावर त्यांनी प्रथम पारितोषिकावर आपले नाव कोरले.
स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बंटीभाऊ मोहुर्ले, जितेंद्रजी टिकले (नगरसेवक, न.पं. एटापल्ली), विजय नल्लावार (भाजपा जिल्हा सचिव) तसेच सामाजिक कार्यकर्ते महेंद्रभाऊ सुल्वावार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला चषक व रोख बक्षीस प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंच्या कौशल्याचे कौतुक करत ग्रामीण भागातील अशा स्पर्धांमुळे स्थानिक खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळत असल्याचे मत व्यक्त केले.
प्रणय क्रिकेट क्लबच्या या यशानंतर एटापल्ली परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून, विजेत्या संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उत्कृष्ट नियोजन आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनामुळे राजे फॅन्स क्लब आयोजित ही स्पर्धा प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने क्रिकेटची मेजवानी ठरली.







