उप संपादक: तेजेश गुज्जलवार
एटापल्ली: तालुक्यातील जारावंडी गावात आज दिनांक ९ जानेवारी रोजी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. घरामागील परिसरात खेळत असताना संडासाची जुनी व कुजलेली भिंत कोसळून एक वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.
लावण्या सुरज पत्रे (वय १ वर्ष) ही चिमुकली आपल्या घरामागे खेळत असताना अचानक संडासाची जुनी भिंत कोसळली. भिंतीखाली सापडल्याने लावण्याचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना इतक्या क्षणात घडली की कुटुंबीयांना सावरायचीही संधी मिळाली नाही.
या अपघातात कल्पना विनोद टेकाम (वय ३०) या महिलाही गंभीर जखमी झाल्या असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे तातडीने रेफर करण्यात आले आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे जारावंडी गावात शोककळा पसरली असून, लावण्या पत्रे हिच्या अकाली मृत्यूने संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. जुने व धोकादायक बांधकाम हटविण्याबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.







