मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
गडचिरोली, दि. १८ : मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी गडचिरोली येथे पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दुपारी १२ ते २ या वेळेत हे शिबिर पार पडणार आहे.
या शिबिरात पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, रक्तदाब आणि मधुमेह चाचणीसह हृदयविकार, डोळे, कान, नाक व घसा तपासणी, यकृत व मूत्रपिंड कार्यक्षमता चाचणी, ईसीजी, हिमोग्लोबिन तपासणी तसेच स्त्रीरोग आणि बालरोग तपासणीदेखील केली जाणार आहे.
यासोबतच, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी आधार कार्ड आणि आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.
पत्रकारांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी यांनी केले आहे.