एटापल्ली जारावंडी-कसनसुर भागात महावितरणच्या अंदाजे बिलांचा गोरखधंदा _दर महिन्याला लाखोंची अवैध वसूली, नागरिकांत संताप_

54

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

प्रतिनिधी:तेजेश गुज्जलवार

जारावंडी आणि कसनसुर या दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांसमोर महावितरणच्या अंदाजे बिल वितरणामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या दुर्गम भागातील नागरिकांना नियमित मीटर रीडिंग न घेता अंदाजे बिले पाठवली जात असून, दर महिन्याला लाखोंची अवैध वसूली सुरू आहे. या भागातील बहुसंख्य नागरिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून, अशिक्षित असल्यामुळे महावितरणच्या मनमानी निर्णयांशी लढा देण्यासाठी त्यांना कोणतेही साधन उपलब्ध नाही. दर महिन्याला त्यांच्यावर अनावश्यक आर्थिक ओझे लादले जात आहे, आणि यामुळे नागरिकांत प्रचंड असंतोष पसरला आहे.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्षात मीटर रीडिंग न घेता अंदाजे बिले तयार केली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. बऱ्याच महिन्यांपासून ही पद्धत सुरु असल्याचे नागरिक सांगतात. अशिक्षित व साधन संपन्नतेपासून वंचित असलेल्या या आदिवासी भागात महावितरणने अंदाजे बिलं पाठवून लाखोंची रक्कम वसूल केली आहे. एकीकडे हे नागरिक अत्यंत साध्या जीवनशैलीने आपले जीवन जगत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या वापराशी साधर्म्य नसलेल्या विजेची बिले त्यांच्यावर थोपवून त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नावर जास्तीत जास्त आर्थिक भार वाढवला जात आहे. महावितरणने प्रत्यक्षात वीज मीटर रीडिंग न घेता अंदाजे वाचन करून बिले बनवणे हा ग्राहकांच्या हक्कांचा सरळ सरळ भंग असल्याचे दिसत आहे

जारावंडी आणि कसनसुर हे परिसर अतिशय दुर्गम आणि दुबळ्या आर्थिक परिस्थितीतील भाग आहेत. अशा ठिकाणी महावितरणची नियमित वाचन व्यवस्था नाही, आणि मनुष्यबळाची कमतरता असल्याचे कारण देऊन प्रत्यक्षात मीटर वाचन करण्यास टाळाटाळ केली जाते. या पद्धतीचा फायदा घेऊन महावितरणने या भागातील नागरिकांना अंदाजे बिले थोपवण्याचे काम चालवले आहे. येथील नागरिकांना दर महिन्याला त्यांच्याकडून अधिक रक्कम वसूल केली जाते, आणि त्यांचे मासिक बिल थेट लाखोंच्या घरात जात आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या या नागरिकांवर बिले भरण्याचा ताण पडत असून, ते अनेकदा आपल्या कुटुंबातील आवश्यक गरजा भागवू शकत नाहीत.

या प्रकरणाबाबत महावितरणकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी असे सांगितले आहे की, दुर्गम भागांमध्ये नियमित रीडिंग घेणे अवघड असल्यामुळे अंदाजे बिले पाठवली जातात. महावितरणच्या या निर्णयामुळे येथे मोठा असंतोष आहे. अशिक्षित असलेल्या आदिवासी भागातील नागरिकांमध्ये वीज खंडित करण्याची भीती निर्माण केली जाते, ज्यामुळे ते कोणतेही प्रतिकार न करता बिले भरायला भाग पाडले जात आहेत.

या प्रकरणी नागरिकांत प्रचंड रोष निर्माण झाला असून, त्यांनी जर परिस्थिती बदलली नाही तर महावितरण विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे या भागातील परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. नागरिकांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी दिल्या असल्या, तरी या समस्येवर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.

_महावितरणकडून आम्हाला दर महिन्याला जी बिले येतात, ती आमच्या वापराशी संबंध नसलेली आहेत. आम्हाला हे अंदाजे बिलांचा त्रास सहन करावा लागतो. आम्ही तक्रार केली असता, अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात, पण प्रत्यक्षात कोणीही मदत करत नाही.”_

*ग्राहक,महावितरण*

_आम्हाला वीज सेवा मिळत असली तरी बिलाचे प्रमाण अत्यंत जास्त आहे. आमच्या कुटुंबाचे मासिक उत्पन्नच मर्यादित आहे, त्यात अशा महागड्या बिलांमुळे आमच्यावर आर्थिक संकट येत आहे.”_

*महिला ग्राहक,महावितरण*