*’कुर्ता’ बेटावर बिकट समस्या* *नावेच्या साहाय्याने भाग्यश्रीताई आत्राम पोहोचल्या बेटावर*

95

अहेरी:-भारत देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 75 वर्ष पूर्ण झाली.नुकतेच देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.मात्र,जिल्ह्यातील अतिदुर्गम व आदिवासी बहुल भागात वीज,मुख्य रस्ते,नदी-नाल्यावर पूल आणि पाण्यापासून वंचित आहेत.असाच प्रकार अहेरी तालुक्यातील महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांना विभागणाऱ्या इंद्रावती नदीच्या बेटावर वसलेल्या ‘कुर्ता’ गावात आहे. सिनेट सदस्य तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी कुर्ता गावाला भेट दिल्यावर अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहे.

अहेरी तालुक्यातील दामरंचा ग्रामपंचायत अंतर्गत रुमलकसा,वेलगुर,कोयागुडम, भंगारमपेठा,तोंडेर,चिटवेली,चिंतारेव आदी गावांचा समावेश आहे.ही सर्व गावे इंद्रावती नदीच्या काठावर वसलेले आहेत.याच इंद्रावती नदीच्या मधोमध एक ‘कुर्ता’ नावाचा गाव वसलेले आहे.सध्या या गावात 5 ते 6 कुटुंब असून जवळपास मागील 50 वर्षांपासून याच बेटावर शेती करून येथील ही आदिवासी बांधव उदरनिर्वाह करत असल्याचे सांगतात. मात्र,कुर्ता हे गाव बेटावर वसलेले असल्याने येथील नागरिकांना बाराही महिने जलप्रवास केल्याशिवाय पर्याय नाही.पावसाळ्यात तर इंद्रावती नदी रौद्ररूप धारण करीत असते.अश्या परिस्थितीत येथील आदिवासींना अक्षरशः जीव धोक्यात टाकून बाहेर पडावं लागते.

माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम नुकतेच दामरंचा आणि भंगारमपेठा दौऱ्यावर होते.यावेळी येथील काही नागरिकांनी त्यांची व्यथा मांडली. सांयकाळची वेळ असतानाही भाग्यश्रीताई आत्राम यांनी आदिवासींच्या रहदारीच्या व्यवस्थेतील एक महत्वाचा भाग असलेल्या नावेच्या साहाय्याने जीव धोक्यात टाकून कुर्ता गाव गाठले.गावात भेट देताच येथील आदिवासी माता-बघिणींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.मात्र,त्यांचे जमीनदोस्त झोपड्या, दोन-चार भांडी, दोन-चार पिशव्या, चुलीसाठी तीन दगड आणि काही कपडे ही परिस्थिती बघितल्यास दगडालाही पाझर फुटेल अशी त्यांची अवस्था.

गावातील सर्व नागरिक एकत्र येऊन आपली समस्या मांडली. त्यात काही नागरिकांना आधार कार्ड,मतदान कार्ड,गावात शाळा आणि अंगणवाडी एवढेच काय तर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने नदीपात्रातून पाणी घेऊन येण्याची नामुष्की ओढवल्याचे सांगितले. विशेष म्हणजे बेटावर गाव असल्याने रस्ता नाही त्यामुळे गावात वीजही पोहोचले नाही.विशेष म्हणजे शासकीय योजनांसाठी लागणारे दाखले नसल्याने त्यांना विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.शासन आणि प्रशासनाने आमची समस्या लक्षात तातडीने सोडवावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली.बेटावरून छत्तीसगड राज्यातील सन्ड्रा हे गाव दूर असून महाराष्ट्रातील दामरंचा हे गाव जवळ असल्याने त्यांचा संपर्क नेहमीच दामरंचा ग्रामपंचायतशी येत असून काही नागरिक मतदान करत असल्याचे सांगितले.यावेळी कुर्ता येथील किष्टा कारे वासाम,मुन्ना किष्टा वासाम,रेणू किष्टा वासाम,पेंटा आत्राम,समय्या आत्राम,पापय्या आत्राम,सक्कु वासाम,नागी आत्राम,वनिता आत्राम,बंडे वासाम आणि माजी प स समिती सदस्य राकेश पनेला,माजी सरपंच लिंगय्या सुरमवार,महेश पन्नेला,खुशाल आलाम, गंगाराम तोर्रेम, बाबूराव तोर्रेम आदी उपस्थित होते.समस्या पोहोचणार शासन दरबारी

‘कुर्ता’ गावातील नागरिकांची समस्या जाणून घेण्यासाठी मी स्वतः बेटावर गेले.दामरंचा वरून तीन किलोमीटर गेल्यावर इंद्रावती नदीच्या पत्रातून गावकऱ्यांनी स्वतः तयार केलेल्या डोंग्याने गाव गाठले.गावात 6 ते 7 कुटुंब असल्याचे निदर्शनास आले.गावात अंगणवाडी, शाळा नसल्याने बरेच विध्यार्थी गावातच आहेत.गावात कुपोषित बालक असल्याचे निदर्शनास आले. नदीच्या मधोमध बेटावर गाव असल्याने पूल व रस्ता बनविणे शक्य नसलेतरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कडून मोटार बोट दिले पाहिजे.विजेची समस्या सोडवण्यासाठी सोलार प्लेटची व्यवस्था करावी एवढेच नव्हेतर शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांच्याकडे असलेले आणि नसलेले कागदपत्रांची चाचपणी करण्यासाठी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.मुख्य म्हणजे एक मुलगा कुपोषित असल्याचे आढळले.या सर्व समस्या सोडवण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येत आहे. येथील विविध समस्या वरिष्ठ पातळीवर मांडणार असून तात्काळ प्रशासनाने या गंभीर समस्यांची दखल घ्यायला भाग पाडणार आहे. जेणेकरून आदिवासी बांधवांच्या समस्या मार्गी लागणार.
-भाग्यश्री आत्राम,सिनेट सदस्य तथा माजी अध्यक्ष जि प गडचिरोली