समलैंगिक’ नव्हे, तर तो ब्लॅकमेलिंगचा होता खेळ; लाखो रुपयांच्या वसुलीसाठीच मित्राचा क्रूर खून!

17

मृतकाच्या भावाचा व नातेवाईकांचा पत्रकार परिषदेत खळबळजनक खुलासा;

आलापल्ली/नागेपल्ली:सोशल मीडियावरील मैत्रीतून झालेल्या एका तरुणाच्या हत्येप्रकरणी आता एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक खुलासा समोर आला आहे. काही प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाला ‘समलैंगिक विवाहाचा नकार’ असे रंगवून वृत्त प्रसिद्ध केले होते, मात्र हा दावा मृताच्या कुटुंबीयांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. आरोपी हा मुलीचा आवाज काढून मृतकाला गेल्या अनेक दिवसांपासून ब्लॅकमेल करत होता आणि याच ब्लॅकमेलिंगमधून ही क्रूर हत्या झाल्याचा आरोप मृताच्या भावाने आणि नातेवाईकांनी पत्रकार परिषदेत समोर आणला आहे.आज मृतकाचा भाऊ सारोज निषाद,मोठे भाऊ पवन बाथो, चुलत भाऊ ब्रजकुमार निषाद यांनी नागेपल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन सदर माहिती दिली.
मुलीच्या आवाजात इन्स्टाग्रामवर मैत्री आणि लाखो रुपयांची लूट
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने इन्स्टाग्रामवर मुलीच्या नावाने खोटे अकाऊंट तयार केले होते. इतकेच नव्हे तर मुलीचा आवाज काढून त्याने मृतकाशी जवळीक साधली. या मैत्रीचा गैरफायदा घेत आरोपीने मृतकाला विविध प्रकारे जाळ्यात ओढले आणि वारंवार ब्लॅकमेल करून त्याच्याकडून लाखो रुपये उकळले.फोन ब्लॉक केल्याने आरोपी आलापल्लीत दाखलसततच्या त्रासाला आणि आर्थिक लुटीला कंटाळून जेव्हा मृतकाने आरोपीचे फोन नंबर ब्लॉक केले, तेव्हा आरोपीने थेट मृतकाच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना संपर्क साधून त्रास देण्यास सुरुवात केली. मृतकाचा शोध घेत आरोपी थेट आलापल्ली-नागेपल्ली परिसरात पोहोचला.घटनेच्या आदल्या दिवशी समझोता, पण मनात होतं कारस्थान!हत्या होण्याच्या एक दिवस आधी मृतक आणि आरोपी यांच्यात भेट झाली होती. यावेळी मृतकाने आरोपीला “पुन्हा असे ब्लॅकमेल करू नको” असे स्पष्ट शब्दांत समजावून सांगितले होते. त्यावेळी आरोपीने आपल्या कृत्याबद्दल दिलगिरी (माफी) सुद्धा व्यक्त केली होती. मात्र, आरोपीच्या मनात आधीपासूनच एक भयंकर कट शिजत होता. दुसऱ्या दिवशी आरोपी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघाला. आरोपीने गोड बोलून मृतकाला गाडीत बसवले व जंगलात नेऊन त्याची चाकूने भोसकून अत्यंत क्रूरपणे हत्या केली.मोबाईल चॅटिंग आणि बँक ट्रान्झॅक्शनचे सबळ पुरावेहा कोणताही समलैंगिक संबंधांचा प्रकार नसून निव्वळ आर्थिक फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. यासाठी मृतकाच्या भावाने पत्रकार परिषदेत आरोपीसोबत झालेले मोबाईल चॅटिंग, पैसे पाठवल्याचे बँक ट्रान्झॅक्शन आयडी आणि इतर अनेक तांत्रिक पुरावे माध्यमांसमोर सादर केले.माध्यमांच्या ‘त्या’ वृत्तावर कुटुंब दुखावले; कठोर कारवाईची मागणीकोणतीही सखोल चौकशी न करता केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी काही माध्यमांनी या प्रकरणाला ‘समलैंगिक संबंधांचे’ रूप दिले. यामुळे आधीच दुःखात असलेल्या आमच्या कुटुंबाच्या भावना तीव्रतेने दुखावल्या गेल्या आहेत, अशी तीव्र नाराजी नातेवाईकांनी व्यक्त केली. हे प्रकरण वरकरणी दिसते त्यापेक्षा खूप मोठे असून, या ब्लॅकमेलिंगच्या रॅकेटची पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करावी आणि आरोपीला कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी, अशी आर्त मागणी मृतकाच्या कुटुंबीयांनी केली आहे.