तेजेश गुज्जलवार
उपसंपादक
अहेरी :अहेरी तालुक्यातील महिला सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वूमन (NFIW) च्या तालुका अध्यक्षपदी कॉ. नेहा नारलावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी NFIW च्या जिल्हाध्यक्षा यांच्या सूचनेनुसार जाहीर केली. त्यांच्या नियुक्तीमुळे अहेरी तालुक्यातील महिलांना एक सक्षम नेतृत्व मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या नियुक्तीनंतर बोलताना कॉ. नेहा नारलावार यांनी सांगितले की, तालुक्यातील महिलां व युवतींना भेडसावणाऱ्या विविध समस्या जसे की सुरक्षिततेचा अभाव, शिक्षणातील अडचणी, आरोग्य सुविधा, बेरोजगारी, तसेच ग्रामीण भागातील बालविवाह व अत्याचाराचे प्रकार यावर ठोसपणे काम केले जाईल. महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करून त्यांना संघटित करण्यावर भर दिला जाणार आहे.तसेच त्यांनी अहेरी तालुक्यातील सर्व महिला व युवतींना आवाहन केले की, NFIW मध्ये मोठ्या संख्येने सदस्य म्हणून सहभागी व्हावे, आपल्या हक्कांसाठी संघटित व्हावे आणि एकत्र येऊन आपल्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा.
कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सांगितले की, NFIW च्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा दिला जात असून, कॉ. नेहा नारलावार यांच्या नेतृत्वाखाली अहेरी तालुक्यात महिलांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील.या नियुक्तीमुळे स्थानिक महिला व युवतींमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आता अधिक सक्षम प्रयत्न होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.







