उप संपादक: तेजेश गुज्जलवार
एटापल्ली (जि. गडचिरोली), दि. २० मे २०२६:
सोशल मीडियावर “नक्षल समर्थक” व “अर्बन नक्षल” असे गंभीर आरोप करून भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) ची बदनामी केल्याच्या निषेधार्थ भाकपा आक्रमक झाली असून संबंधित व्यक्तींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत पोलीस स्टेशन एटापल्ली येथे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनानुसार, दि. १९ मे २०२६ रोजी “राजकीय रणधुमाळी” या व्हॉट्सअॅप ग्रुपवर भाकपाचे कार्यकर्ते कॉ. सुरज जककुलवार यांनी लोकशाही मार्गाने झालेल्या आंदोलनाचा व्हिडिओ माहितीस्तव शेअर केला होता. या व्हिडिओवर अहेरी येथील रवी नेलकुद्री यांनी जाणीवपूर्वक “नक्षल समर्थक पक्ष” व “अर्बन नक्षल वाढवण्याचा प्रयत्न” अशा आशयाची आक्षेपार्ह व दिशाभूल करणारी टिप्पणी केली.
या वक्तव्यामुळे पक्षाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची समाजात मानहानी झाली असून जनतेमध्ये भीती, गैरसमज व तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच या प्रकारामुळे परिसरातील शांतता व कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, असे निवेदनात नमूद आहे.
याच ग्रुपवर रवी नेलकुद्री यांनी दंतेवाडा येथील शहीद जवानांबाबत “JNU मध्ये जश्न साजरा करण्यात आला” असा कोणताही ठोस पुरावा नसलेला मजकूर शेअर करून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महेश बेझनकीवार (रा. अहेरी) यांनी “कम्युनिस्ट का काला इतिहास” या नावाचा व्हिडिओ शेअर करून कम्युनिस्ट विचारसरणी व भाकपाची बदनामी केल्याचेही नमूद करण्यात आले आहे. पुरावा मागितल्यानंतरही त्यांनी कोणतीही माहिती सादर केली नसल्याचे सांगण्यात आले.
सदर प्रकरणात आरोपींनी मोबाईल व इंटरनेटचा गैरवापर करून जाणीवपूर्वक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदनासोबत पुरावा जोडण्यात आले आहेत.
आरोपी रवी नेलकुद्री व महेश बेझनकीवार यांच्यावर तात्काळ FIR दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाकपा तर्फे करण्यात आली आहे. योग्य ती कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
प्रतिक्रिया:
भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सांगितले की, *”जनतेच्या सेवेसाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत. समाजात द्वेष व खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू.”







