एटापल्ली वनपरिक्षेत्रात वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई, वन विभागाने फिरवली जेसीबी

396

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली : भामरागड वनविभागांतर्गत येणाऱ्या एटापल्ली वनपरिक्षेत्रातील एटापल्ली नियतक्षेत्रामध्ये वनजमिनीवर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर वनविभागाने तात्काळ कारवाई करत संबंधित अतिक्रमण हटविले. या कारवाईमुळे वनक्षेत्राचे संरक्षण करण्याबाबत वनविभागाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एटापल्ली नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 345 मध्ये दोन ठिकाणी तसेच कक्ष क्रमांक 348 मध्ये एका ठिकाणी वनजमिनीवर अतिक्रमण करण्यात आले होते. यानंतर वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली व संबंधित अतिक्रमणकर्त्यांना आवश्यक ती सूचना दिली.

वनअधिकाऱ्यांनी संबंधितांकडून वनजमिनीवरील ताब्याबाबत वैध कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. यासाठी संबंधितांना पुरेसा वेळदेखील देण्यात आला होता. मात्र, मुदतीत कोणतीही वैध कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे वनजमिनीचे संरक्षण आणि शासकीय मालमत्तेचे संवर्धन या दृष्टीने वनविभागाने नियमानुसार कारवाई करत अतिक्रमण हटविले.सदर कारवाईदरम्यान वनविभागाच्या पथकाने अतिक्रमित जागेची मोजणी करून तेथील अनधिकृत बांधकाम व शेतीसाठी करण्यात आलेली साफसफाई हटविण्याची प्रक्रिया पूर्ण केली. वनजमिनीवरील वाढत्या अतिक्रमणाच्या घटनांमुळे जंगल क्षेत्र कमी होत असून पर्यावरणीय संतुलन धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वनविभागाने अशा प्रकरणांमध्ये कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.

ही कारवाई भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री शैलेश मिना यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्री दिपक रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्लीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निलीता खोब्रागडे व परिसरातील सर्व वनकर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या ही मोहीम पार पाडली.वनविभागाने नागरिकांना विनंती केली आहे की, वनजमिनीवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये. तसेच वनक्षेत्राशी संबंधित कोणतेही काम करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या आणि वैध कागदपत्रांची पूर्तता करावी. अन्यथा नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वनविभागाकडून देण्यात आला आहे.