मावा नार मावा शाळा उपक्रमांतर्गत केंद्रस्तरीय प्रशिक्षणास एटापल्लीत सुरुवात

148

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली : शैक्षणिक सत्र 2025-26 च्या उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ घडवून आणण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद गडचिरोलीतर्फे “मावा नार मावा शाळा” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. मा. सुहास गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम इयत्ता 1 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा व गणित विषयातील मूलभूत कौशल्ये बळकट करण्यावर केंद्रित आहे. या अंतर्गत 100 दिवसांचा विशेष शैक्षणिक कार्यक्रम राबविला जाणार आहे.

या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी गट साधन केंद्र, पंचायत समिती एटापल्ली येथे केंद्रस्तरीय प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे. मा. ऋषिकेश बुरडकर, गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व केंद्रांवर दिनांक 4 मे 2026 पासून तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. या प्रशिक्षणात शिक्षकांसोबतच प्रेरिका यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असून विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्यासाठी त्यांना विशेष मार्गदर्शन दिले जात आहे.

या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद गडचिरोली, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि ‘उमेद’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणामध्ये भाषा व गणित विषयातील मूलभूत संकल्पना सुलभ पद्धतीने विद्यार्थ्यांना कशा शिकवाव्यात, याबाबत विविध अध्यापन तंत्र, उपक्रमाधारित शिक्षण पद्धती, तसेच विद्यार्थ्यांच्या सहभागातून शिकण्यावर भर देण्यात येत आहे.

प्रशिक्षणादरम्यान श्री. साईनाथ सलाम, विभागीय समन्वयक, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन तसेच श्री. प्रकाश उसेंडी, शिक्षमित्र, भामरागड यांनी गेदा केंद्राला भेट देऊन प्रशिक्षण प्रक्रियेचे निरीक्षण केले व उपस्थित शिक्षक व प्रेरिकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रशिक्षण अधिक प्रभावी व उपयुक्त ठरत असल्याचे सहभागींचे मत आहे.

गेदा केंद्रातील प्रशिक्षण सत्रात एकूण 27 शिक्षक व 30 प्रेरिका उपस्थित होत्या. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक व प्रेरिका यांची अध्यापन कौशल्ये अधिक विकसित होणार असून विद्यार्थ्यांच्या भाषा व गणित विषयातील गुणवत्तेत निश्चितच सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

“मावा नार मावा शाळा” हा उपक्रम ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी एक नवा दिशादर्शक ठरणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोलाची भूमिका बजावणार आहे.