अहेरी नगरपंचायत अंर्तगत प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांचा संताप. नाली, रस्ते व स्ट्रीट लाईटसाठी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना निवेदन

22

*अहेरी:-* अहेरी नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक ०२ मधील मूलभूत सुविधांच्या गंभीर समस्यांमुळे नागरिकांनी एकत्र येत माजी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना निवेदन सादर केले. प्रभागात अद्याप पक्क्या नाल्या, सिमेंट रस्ते व स्ट्रीट लाईटची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पावसाळ्याच्या काळात परिसरात पावसाचे पाणी साचून राहत असून सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होते. परिणामी चिखल, घाण आणि दुर्गंधी यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था दयनीय असून नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

याशिवाय, प्रभागात स्ट्रीट लाईटची कमतरता असल्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर अंधारात बुडत आहे. त्यामुळे विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितपणे हालचाल करणे कठीण झाले आहे. अंधारामुळे अपघात तसेच अनुचित घटनांची शक्यता देखील वाढत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.या संदर्भात अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अखेर नागरिकांनी थेट माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची भेट घेऊन समस्या मांडत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.

यावेळी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी नागरिकांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाला योग्य त्या सूचना देऊन प्रभाग क्रमांक ०२ मध्ये नाली व सिमेंट रस्त्याचे बांधकाम तसेच आवश्यक त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसविण्याची येईल, असे आश्वासन दिले.

यावेळी निवेदन देतांना सौ.दिवा शिवराम वेलादी,सौ ज्योती नामराजू पटनुरी,सौ.तुलसी पोचम आत्राम, सौ.जमुना रमेश आसाम, सौ.वैशाली रेणू तिम्मा, सौ.मनीषा सतीश महाका,सौ.सरिता रमेश वेहदा, सौ.शांता सावन मट्टामी संजय तिम्मा,अमोल गुडेल्लीवार आदि उपस्थित होते.