डुम्मे शाळेत शिक्षकांची कमतरता; ७ दिवसांत नियुक्ती न झाल्यास शाळेला कुलूप लावण्याचा इशारा

304

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली : तालुक्यातील मौजा डुम्मे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या तीव्र कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण गंभीरपणे बाधित होत असल्याची बाब समोर आली आहे. इयत्ता ५ वी, ६ वी, ७ वी व ८ वीच्या वर्गांसाठी आवश्यक शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन ठप्प झाले आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी पंचायत समिती एटापल्ली येथील गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन देत तात्काळ शिक्षक नेमणुकीची मागणी केली आहे.

गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, शाळेत सध्या उपलब्ध असलेले शिक्षक अपुरे असल्याने सर्व वर्गांचे व्यवस्थित अध्यापन करणे शक्य होत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण होत नाहीत तसेच त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. ग्रामीण व विशेषतः आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण ही प्रगतीची एकमेव संधी मानली जाते. मात्र शिक्षकांच्या अभावामुळे ही संधीच धोक्यात आली असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.

शाळेतील ही परिस्थिती केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर पालकांसाठीही चिंतेची बाब ठरत आहे. अनेक पालक आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील असतात, मात्र शिक्षक नसल्यामुळे मुलांचे भवितव्य अंधकारमय होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यामुळे गावात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाविरोधात रोष वाढताना दिसत आहे.

गावकऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, पुढील ७ दिवसांच्या आत शाळेत आवश्यक त्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. अन्यथा आठव्या दिवशी ग्रामस्थांच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळा डुम्मे येथे शाळेला कुलूप लावून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर कायमस्वरूपी शिक्षकांची नेमणूक करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तात्पुरत्या स्वरूपात तरी अतिरिक्त शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

निवेदन देताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अकलेश झाडे, उपाध्यक्ष सदाशिव दुर्वा, पोलीस पाटील जोगाजी मडावी, गाव भूमिया अरुण दुर्वा, पेसा समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगाटी, जेष्ठ नागरिक भीमराव देवताळे, तोंदे मडावी, चमरु दुर्वा, किशोर दुर्वा, विनोद पुंगाटी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते अक्षय पुंगाटी, मारोती दहागावकर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

या घटनेमुळे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेतील उणिवा पुन्हा एकदा समोर आल्या असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.