त्या तीन कोटीच्या निविदा प्रक्रिया गैरप्रकाराची चौकशी सूरू! जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल, मुख्याधिकारी व संबंधितांवर कार्यवाही ची टांगती तलवार?

419

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली: नगर पंचायतने दीड महिन्यापूर्वी डी. एम. एफ. योजने अंतर्गत तीन कोटी रुपयेच्या वाचनालय बांधकामासाठी प्रसिद्ध इ-निवीदा सुचना प्रक्रियेत घोळ केला जात असल्याचे वृत्त इंडियन दस्तक न्यूस पोर्टलने दोन आठवड्यापूर्वी प्रकाशित केले होते. सदर वृत्ताची दखल घेऊन जिल्हाधिकारी अविशांत पंड्या यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निविदा प्रकियेत घोळ करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दनाणले आहेत.

नगर पंचायत ग्राहक जा. कं. ४६/२०२६ दिनांक १९ जानेवारी रोजी प्रसिध्द मूल्य ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. अंदाज पत्रकात किंमत तीन कोटी रुपये असलेल्या सार्वजनिक वाचनालय इमारत बांधकाम व इतर सुविधासाठी निवीदा प्रक्रियेत चार कंत्राटदारांनी रितसरपणे आणि सर्व अटी व शर्तीची पुर्तता करून ऑनलाईन पध्दतीने निवीदा सादर केली आहे. मात्र मुख्याधिकारी व प्रशासनाकडून ही संपूर्ण निवीदा प्रक्रिया पारदर्शक पध्द्तीने राबविण्यात आली नसल्याची तक्रार बांधकाम सभापती निजान पेंदाम, नगरसेवक मनोहर बोरकर, किसन हिचामी, नगरसेविका दीपयंती पेंदाम यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे केली होती, तक्रारीत मुख्याधिकारी यांच्या जवळच्या आणि मर्जीतल्या व्यक्ती व्यतिरिक्त इतर एका पात्र निवीदाकाराने निवीदा भरल्यामुळे, सदर निवीदा ठरलेल्या दिवशी २८ जानेवारीला नियमानुसार उघडण्याने बंधनकारक असतांना एक महिन्याचा कालावधी होऊनही निविदा उघडण्यात आलेली नसल्याचा आरोप निवेदनातुन केला होता.

त्यामुळे मुख्याधिकारी यांच्याकडून आपल्या पदाचा गैरवापर करून, विशीष्ठ ठेकेदाराला फायदा मिळवुन देण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सरपणे ही प्रक्रिया थांबवली आहे, आणि त्यात गैरप्रकार केली आहे असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ही कृती पूर्णपणे मनमानी, बेकायदेशिर आणि सार्वजनिक निधीच्या हिताविरूध्द आहे. अशाप्रकारच्या कृतीमुळे शासनाच्या पारदर्शक कारभाराच्या धोरणाचे उल्लंघन होत असुन इतर प्रामाणिक आणि पात्र कंत्राटदारांवर अन्याय होत असल्याचे निवेदनातून म्हटले होते.

त्यामुळे उपरोक्त प्रकरणात तात्काळ लक्ष घालुन संपूर्ण निवीदा प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी, तथा चौकशी पूर्ण होईपर्यंत सदर निवीदा प्रक्रियेला स्थगिती देऊन चौकशीमध्ये दोषी आढळणारे मुख्य अधिकारी व इतर संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकिय व कायदेशिर कारवाई करण्याची मागणी सभापती निजान पेंदाम, नगरसेवक मनोहर बोरकर, किसन हिचामी व दीपयंती पेंदाम, यांनी केली होती. आता जिल्हाधिकारी अविशांत पंड्या यांच्या चौकशीत दोषीवर कोणती कारवाई केली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.