अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी
एटापल्ली: नगर पंचायतने एक महिन्यापूर्वी डी.एम.ए. योजने अंतर्गत कामासाठी इ-निवीदा सुचना प्रसिध्द केली आहे. निविदा प्रक्रियेत घोळ केल्याचा संशय घेऊन प्रक्रियेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी बांधकाम समिती सभापती निजान पेंदाम, नगरसेवक मनोहर बोरकर, किसन हिचामी व नगरसेविका दीपयंती पेंदाम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
नगर पंचायत ग्राहक जा. कं. ४६/२०२६ दिनांक १९ जानेवारी रोजी प्रसिध्द मूल्य ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर निविदा प्रक्रियेत चार कंत्राटदारांनी रितसरपणे आणि सर्व अटी व शर्तीची पुर्तता करून ऑनलाईन पध्दतीने निविदा सादर केली आहे. मात्र मुख्याधिकारी प्रणय तांबे व प्रशासनाकडून ही संपूर्ण निवीदा प्रक्रिया पारदर्शक पध्द्तीने राबविण्यात आली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मुख्याधिकारी यांच्या जवळच्या आणि मर्जीतल्या व्यक्ती व्यतिरिक्त इतर एका पात्र निवीदाकाराने निवीदा भरल्यामुळे, सदर निवीदा ठरलेल्या दिवशी २८ जानेवारीला नियमानुसार उघडण्याने बंधनकारक असतांना सव्विस दिवसाचा कालावधी लोटुन देखील निविदा उघडण्यात आलेली नसल्याचा आरोप निवेदनात केला आहे.
त्यामुळे मुख्याधिकारी यांच्याकडून आपल्या पदाचा गैरवापर करून, विशिष्ठ ठेकेदाराला फायदा मिळवुन देण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सरपणे ही प्रक्रिया थांबवली आहे, आणि त्यात गैरप्रकार केली आहे असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ही कृती पूर्णपणे मनमानी, बेकायदेशिर आणि सार्वजनिक निधीच्या हिताविरूध्द आहे. अशाप्रकारच्या कृतीमुळे शासनाच्या पारदर्शक कारभाराच्या धोरणाचे उल्लंघन होत असुन इतर प्रामाणिक आणि पात्र कंत्राटदारांवर अन्याय होत आहे.
त्यामुळे उपरोक्त प्रकरणात तात्काळ लक्ष घालुन संपूर्ण निवीदा प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी, तथा चौकशी पूर्ण होईपर्यंत सदर निवीदा प्रक्रियेला स्थगिती देऊन चौकशीमध्ये दोषी आढळणारे मुख्य अधिकारी व इतर संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकिय व कायदेशिर कारवाई करण्याची मागणी सभापती निजान पेंदाम, नगरसेवक मनोहर बोरकर, किसन हिचामी व दीपायंती पेंदाम, यांनी केली आहे.







