स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांची गैरसोय; एकरा बु. मार्गावरील पुलांची दयनीय अवस्था

170

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली :- एटापल्ली तालुक्यातील एकरा बु. गावाकडे जाणाऱ्या मुख्य ग्रामीण मार्गावरील पुलांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. काही वर्षांपूर्वी या मार्गावर पुलांचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र, सद्यस्थितीत हे पूल कोसळले असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण तसेच ग्रामस्थांची सतत वर्दळ असते. असे असतानाही स्थानिक प्रशासनाने या समस्येकडे डोळेझाक केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. दरवर्षीप्रमाणे भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय, एटापल्ली येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागामार्फत सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन विविध ग्रामीण भागात करण्यात येते. यावर्षी हे शिबिर एकरा बुजरुग येथे आयोजित करण्यात आले. शिबिरासाठी ये-जा करताना विद्यार्थ्यांना या मार्गावरील पुलांची दयनीय अवस्था प्रत्यक्ष अनुभवास आली. पुलांवरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून अपघाताचा धोका कायम आहे.

सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पुढाकार घेत मुरूम, दगड व पाणी टाकून पुलांवरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्याचे श्रमदान केले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे काही काळासाठी नागरिकांची गैरसोय कमी झाली असली, तरी ही उपाययोजना कायमस्वरूपी नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढताच हे मुरूम वाहून जाईल आणि पुलांची अवस्था पुन्हा जैसे थे होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.स्थानिक पातळीवर शासनाच्या विविध योजनांतर्गत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होत असतानाही एटापल्ली ते एकरा बुजरुग या मार्गावरील रस्ते व पुलांची दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी अद्याप करण्यात आलेली नाही. मंजूर निधीचा योग्य वापर होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

या मुख्य रस्त्याची दुरवस्था प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास असूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्थानिक पोलीस पाटील, ग्रामसेवक व सरपंच यांनी शासनाकडे तातडीने पाठपुरावा करून या ग्रामीण मार्गाची दुरुस्ती व पुलांची पुनर्बांधणी करून घ्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.