उप संपादक: तेजेश गुज्जलवार
*विकासकामांना अधिकाऱ्यांची दाद*
एटापल्ली:तालुक्यातील जवेली बुज ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत विविध विकासकामांची पाहणी करण्यात आली. जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या उपस्थितीत ही भेट पार पडली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, गटविकास अधिकारी आंधळे, पंचायत विस्तार अधिकारी रवींद्र कुनघाडकर आणि पंचायत समिती एटापल्लीचे प्रशासकीय अधिकारी मडावी यांनी ग्रामपंचायत जवेली बुज येथे भेट देत विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
ग्रामपंचायतीत श्रमदानातून करण्यात आलेली गटार साफसफाई, गाव स्वच्छता मोहीम, विकसित करण्यात आलेले क्रीडांगण, क्रिकेट, कबड्डी व खो-खो मैदाने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरातील पसरबाग, ग्रामपंचायत फळबाग, वनराई बंधारा तसेच बाबू हस्तकला प्रशिक्षण केंद्र या उपक्रमांचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले.
मान्यवरांचे स्वागत आदिवासी पारंपरिक पद्धतीने वृक्ष देऊन करण्यात आले. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्र आणि ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देत ग्रामविकासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सरपंच कु. अलिशाताई गोटामी, ग्रामपंचायत अधिकारी प्रदीप बेलखेडे, उपसरपंच दामजी हिचामी, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट प्रतिनिधी, ग्रामरोजगार सेवक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी गटविकास अधिकारी आंधळे यांनी सर्व मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानले.







