राजे अम्ब्रिशराव महाराजांच्या हस्ते एटापल्ली भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

205

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी एटापल्ली येथे नव्याने उभारण्यात आलेल्या भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा मा. राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

उद्घाटन प्रसंगी बोलताना मा. राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी सांगितले की, “जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्या तत्काळ समजून घेण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हे महत्त्वाचे माध्यम ठरणार आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा, केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम अधिक प्रभावीपणे होईल.” भाजप ही केवळ राजकीय संघटना नसून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी चळवळ असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, नगरपंचायतच्या भाजप नगराध्यक्षा सौ. रेखाताई मोहूर्ले, भाजप तालुका अध्यक्ष प्रसाद पुल्लूरवार, तोडसा ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रशांत आत्राम, मोहन नामेवार, राकेश हिरा, तिरुपती चापले, आविष्कार गड्डमवार, सुरेखाताई अडगोपुलवार, निर्मलाताई कोडबतुनवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी कार्यालयाच्या माध्यमातून पक्षकार्य अधिक गतिमान करण्याचा निर्धार व्यक्त केला.

नव्या जनसंपर्क कार्यालयामुळे एटापल्ली तालुक्यात भाजपच्या संघटनात्मक कामाला निश्चितच चालना मिळणार आहे. नागरिकांच्या तक्रारी, सूचना व अपेक्षा थेट पक्षापर्यंत पोहोचवण्यासाठी हे कार्यालय एक प्रभावी दुवा ठरेल. तसेच युवक, महिला, शेतकरी, आदिवासी समाज घटकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी येथे अधिक सुनियोजित पद्धतीने होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित कार्यकर्त्यांनी “सबका साथ, सबका विकास” या मंत्राला अनुसरून समाजहितासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प केला. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि आनंदोत्सवाच्या वातावरणात हा उद्घाटन सोहळा पार पडला. एटापल्लीतील हे जनसंपर्क कार्यालय आगामी काळात जनतेच्या प्रश्नांसाठी आणि भाजपच्या संघटनात्मक विस्तारासाठी एक महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा ठाम विश्वास सर्व स्तरातून व्यक्त करण्यात आला.