तोडसा येथे जय बाब्बालाई देवीच्या जत्रेत राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या भाग्यश्री आत्राम हालगेकर यांची उपस्थिती

141

उप संपादक : तेजेश गुज्जलवार

एटापल्ली:तालुक्यातील तोडसा येथे जय बाब्बालाई देवीची वार्षिक जत्रा उत्साहात पार पडली. या जत्रेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या भाग्यश्री (आत्राम) हालगेकर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. त्यांच्या उपस्थितीमुळे जत्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या जत्रेला हजारो आदिवासी भाविकांनी हजेरी लावली. धार्मिक श्रद्धा, पारंपरिक संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन या जत्रेत घडले. भाग्यश्री हालगेकर यांनी जय बाब्बालाई देवीची विधिवत पूजा-अर्चा करून परिसरातील जनतेच्या सुख-समृद्धी व विकासासाठी प्रार्थना केली.
यावेळी बोलताना त्यांनी आदिवासी समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यरत असल्याचे सांगितले. आदिवासी भागातील आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा व रोजगारासाठी पक्ष सातत्याने प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश टिकले, विनोद चव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जत्रेचे आयोजन ग्रामस्थ व आयोजन समितीच्या वतीने सुव्यवस्थित पद्धतीने करण्यात आले.
जय बाब्बालाई देवीच्या जत्रेच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक ऐक्य आणि लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.