जिल्हा परिषदेवर कामगारांचा आक्रोश धडक मोर्चा: कामगार प्रमाणपत्रासाठी एल्गार

344

गडचिरोली: दि. ८ जानेवारी २०२६

गडचिरोली: शासनाच्या राजपत्राप्रमाणे कामगारांना ग्रामपंचायतीकडून तातडीने प्रमाणपत्र मिळावे आणि प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी आज, गुरुवार दि. ८ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेवर हजारो कामगारांचा आक्रोश धडक मोर्चा काढण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
या मोर्चात मौशीखांब, मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रासह जिल्हाभरातील कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सकाळी ११ वाजता आयटीआय चौकात जाहीर सभा झाली, ज्यात अरविंद कात्रटवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मोर्चा जिल्हा परिषदेकडे वळवण्यात आला.
या लढ्याला शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, आपल्या न्याय हक्कांसाठी संघटित होण्याची हीच वेळ असल्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.