कोठी आश्रम शाळेत विद्यार्थ्यावर मारहाणीचा गंभीर आरोप; ग्रामस्थांचा संताप, निलंबनाची मागणी

473

भामरागड: शासकीय आश्रम शाळा, कोठी येथील इयत्ता ९ वीतील एका विद्यार्थ्याचे ₹50 हरविल्याची तक्रार सांगण्यासाठी गेल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. संबंधित विद्यार्थी मारहाणीमुळे बेशुद्ध पडल्याचे सांगण्यात येत असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकाराची दखल घेत दि. 13/04/2026 रोजी कोठी ग्रामपंचायत येथे गावातील ग्रामस्थ, पालक वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र जमले. बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत संबंधित जबाबदारांवर तात्काळ कारवाईची जोरदार मागणी करण्यात आली.

ग्रामस्थ व पालकांनी शाळेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी ठाम मागणी केली. विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या बैठकीस मा. प्रकल्प अधिकारी, भामरागड उपस्थित होते. ग्रामस्थ व पालकांनी त्यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:

• विद्यार्थ्यावर झालेल्या मारहाणीची चौकशी करावी
• दोषींवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी
• विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी
• शाळेतील शिस्त व देखरेख मजबूत करावी
• पालकांना सत्य माहिती द्यावी

संतप्त पालकांचा सवाल:

शाळा शिक्षणासाठी की विद्यार्थ्यांना मारहाण करण्यासाठी?
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची?

या गंभीर प्रकरणाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे. 🔥