उप संपादक :तेजेश गुज्जलवार
:एटापल्ली: तालुक्यापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावरील हालेवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवदा गावात एक थरारक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, MH 34 BF 2560 क्रमांकाची बरेझा (Brezza) गाडी घेऊन आलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीचे नाव सतीश निसाद असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.
घटनास्थळी आढळलेल्या परिस्थितीमुळे हा प्रकार घातपात आहे की अपघात, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात असून नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत हालेवरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दाबेराव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, “घटनेचा सखोल तपास सुरू असून सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमकी माहिती देता येईल,” असे सांगितले.
पोलीस घटनास्थळावरील पुरावे गोळा करत असून मृत्यूमागील कारणांचा शोध घेत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.
देवदा येथील या रहस्यमय मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







