ET Brand Disruption Awards 2026 : लॉयड्स समूहाची तिहेरी ऐतिहासिक कामगिरी; गडचिरोलीचा देशपातळीवर गौरव

150

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली : औद्योगिक क्षेत्रातील शाश्वत विकास, नाविन्यपूर्ण व्यवस्थापन आणि ग्रामीण सामाजिक परिवर्तन या तिन्ही आघाड्यांवर उल्लेखनीय कार्य करत लॉयड्स समूहाने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘इकोनॉमिक टाईम्स (ET) ब्रँड डिस्रप्शन अवॉर्ड्स 2026’ या प्रतिष्ठित सोहळ्यात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) आणि लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन यांनी तब्बल तीन महत्त्वाचे पुरस्कार पटकावत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या यशामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक व सामाजिक विकासाच्या वाटचालीला राष्ट्रीय स्तरावर नवे अधोरेखन मिळाले आहे.

यामध्ये आयर्न ओर स्लरी पाईपलाईन प्रकल्पाला “Most Disruptive Supply Chain & Logistics” या श्रेणीत सुवर्ण पुरस्कार, कोन्सरी युनिटच्या प्रगत HR धोरणाला “Most Disruptive HR Team” या श्रेणीत सुवर्ण पुरस्कार, तर व्हिलेज ऑपरेटिंग सिस्टम (VOS) या सामाजिक उपक्रमाला “Most Disruptive Accessibility & Inclusion Initiative” या श्रेणीत रौप्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पर्यावरणपूरक ‘स्लरी पाईपलाईन’ची देशभर दखल
LMEL च्या महत्त्वाकांक्षी Iron Ore Slurry Pipeline प्रकल्पाने देशातील खनिज वाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिक आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. पारंपरिक ट्रक वाहतुकीच्या तुलनेत या प्रणालीमुळे इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला असून कार्बन उत्सर्जनातही लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळत असताना वाहतूक अधिक सुरक्षित, वेगवान आणि किफायतशीर झाली आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेत ET ब्रँड डिस्रप्शन अवॉर्ड्समध्ये या प्रकल्पाला सुवर्ण सन्मान मिळाला.

कर्मचारी कल्याणासाठी कोनसरी री युनिट अग्रेसर
लॉयड्सच्या कोनसरी री युनिटने कर्मचारी हित आणि आधुनिक कार्यसंस्कृती निर्माण करण्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. डिजिटल HR प्रणाली, कौशल्य विकास, कर्मचारी कल्याण आणि सर्वसमावेशक कार्यपद्धती या माध्यमातून कंपनीने आदर्श व्यवस्थापन उभे केले आहे. या प्रगत आणि कर्मचारी-केंद्रित धोरणांमुळे कोनसरी री युनिटला “Most Disruptive HR Team” हा प्रतिष्ठेचा सुवर्ण पुरस्कार मिळाला.

‘VOS’ उपक्रमातून ग्रामीण भागात सकारात्मक बदल
लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या Village Operating System (VOS) या उपक्रमालाही राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले. दुर्गम ग्रामीण भागात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मूलभूत सुविधा पोहोचवणे, स्थानिक नागरिकांना सक्षम करणे आणि विकास प्रक्रियेत सर्वसमावेशकता निर्माण करणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण विकासाच्या या अभिनव मॉडेलला “Most Disruptive Accessibility & Inclusion Initiative” या श्रेणीत रौप्य पुरस्कार मिळाला.

“जबाबदार विकासाची आमची भूमिका कायम” – एमडी बी. प्रभाकरन
या ऐतिहासिक यशाबद्दल प्रतिक्रिया देताना LMEL चे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन म्हणाले, “हे पुरस्कार म्हणजे टीम लॉयड्सच्या शाश्वत विकास, नाविन्य आणि सामाजिक बांधिलकीप्रती असलेल्या समर्पणाची पावती आहे. भविष्यकालीन पायाभूत सुविधा उभारण्यापासून ते लोककेंद्रित कार्यसंस्कृती निर्माण करण्यापर्यंत आणि गडचिरोलीतील स्थानिक समुदायांना सक्षम करण्यापर्यंत आमची भूमिका नेहमीच जबाबदार विकासाची राहिली आहे. या यशामागील प्रत्येक सदस्याच्या कष्टाचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.”

लॉयड्स समूहाच्या या तिहेरी यशामुळे गडचिरोली जिल्ह्याचा औद्योगिक आणि सामाजिक विकासाचा प्रवास देशपातळीवर अधिक ठळकपणे अधोरेखित झाला असून, भविष्यातही अशाच नाविन्यपूर्ण उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.