आलापल्ली–सिरोंचा (NH 353C) महामार्ग रखडला; ठेकेदार बेपत्ता, नागरिकांचा संताप शिगेला – 29 एप्रिलला ‘रस्ता रोको’

260

आलापल्ली–सिरोंचा (NH 353C) महामार्गाच्या कामातील प्रचंड विलंब, अर्धवट स्थिती आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संबंधित ठेकेदार काम सोडून बेपत्ता झाल्याचा आरोप असून त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय व भ्रष्टाचार निवारण समितीच्या वतीने तहसीलदार अहेरी यांना इशारापूर्ण निवेदन देण्यात आले. *जिल्हाध्यक्ष संतोष रामचंद्र ताटीकोंडावार व जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख* यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदन देताना सलाय्या कंबलवर, मधुकर चिलनकर, टाटाजी गेडाम तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

माहितीनुसार, सन 2021 पासून सुरू असलेले हे महामार्गाचे काम आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. तब्बल 6 वर्ष उलटूनही केवळ काही अंतराचे काम पूर्ण झाले असून अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट अवस्थेत सोडण्यात आला आहे. रस्त्यावर टाकलेली गिट्टी व धुळीमुळे प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे.
दुचाकीस्वार घसरून पडणे, टायर पंचर होणे, वाहनांचे नुकसान होणे तसेच धुळीमुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी ठेकेदाराविरोधात तात्काळ कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची मागणी केली आहे.

*दरम्यान, प्रशासनाने तात्काळ काम सुरू करून रस्ता सुरक्षित करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच दि. 29 एप्रिल 2026 रोजी मौजा मोसम येथील संड्रा फाटा येथे ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.*

नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा गंभीर प्रश्न असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट होत आहे.