उमानूर धान खरेदी केंद्रावर मोठा गैरप्रकार संस्थेचे अध्यक्ष,सचिव आणि ग्रेडरच्या संगनमताने धानाची अफरातफर; सामाजिक कार्यकर्ता संतोष ताटीकोंडावार यांच्याकडे तक्रार

531

अहेरी (प्रतिनिधी):
अहेरी तालुक्यातील उमानूर येथील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या हक्काच्या धानाची खरेदी नाकारून, तिथे संस्था चालक आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने मोठा गैरप्रकार केल्याचा खळबळजनक आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी त्रस्त शेतकऱ्यांनी आता ज्येष्ठ समाजसेवक *संतोष भाऊ ताटीकोंडावार* यांच्याकडे धाव घेऊन न्यायाची मागणी केली आहे.
**नेमका प्रकार काय?**
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ते २१ मार्च २०२६ या कालावधीत अनेक शेतकऱ्यांनी आपले धान विक्रीसाठी सोसायटीवर आणले होते. मात्र, संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि ग्रेडर यांनी संगनमत करून या गरीब शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यास जाणीवपूर्वक नकार दिला आणि त्यांचे धान सोसायटीच्या आवारातच पडून ठेवले.
धक्कादायक बाब म्हणजे, ६ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास ट्रॅक्टरने मोठ्या प्रमाणावर धान गोदामात आणून त्याची गुपचूप खरेदी करण्यात आली. हे धान नेमके कोणाचे होते, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. विशेष म्हणजे, या धानाची खरेदी ६ एप्रिलला झाली असताना, त्याची बिले मात्र ‘बॅक डेट’मध्ये म्हणजेच मार्च महिन्यातील जुन्या तारखांमध्ये फाडण्यात आली आहेत. हा प्रकार म्हणजे थेट शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्याचा प्रयत्न असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
**प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष:**
या गंभीर प्रकाराबाबत शेतकऱ्यांनी उपप्रादेशिक व्यवस्थापकांकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. मात्र, अनेक दिवस उलटूनही संबंधित विभागाकडून कोणतीही चौकशी किंवा कारवाई करण्यात आली नाही. प्रशासनाच्या या ढिम्म प्रतिसादामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर संतोष ताटीकोंडावार यांची भेट घेऊन त्यांना सर्व आपबिती सांगितली.
**शेतकऱ्यांचा संताप आणि मागणी:**
शेतकऱ्यांनी या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. “आम्ही रात्रंदिवस मेहनत करून पिकवलेले धान खरेदी केले जात नाही, पण व्यापाऱ्यांचे किंवा मर्जीतल्या लोकांचे धान जुन्या तारखेत खरेदी केले जाते, हा आमच्यावर मोठा अन्याय आहे,” अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
आता या प्रकरणात संतोषभाऊ ताटीकोंडावार काय भूमिका घेतात आणि प्रशासनाला जाग येते का, याकडे संपूर्ण अहेरी तालुक्याचे लक्ष लागले आहे.