कमी वजनाच्या नवजात बालिकेला मिळाले नवजीवन; मोहुर्लीत आरोग्य पथकाची यशोगाथा

74

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली: ग्रामीण भागातील आरोग्य सेवा, आरोग्य कर्मचाऱ्यांची चिकाटी आणि आईच्या मायेच्या उबेने एका कमी वजनाच्या नवजात बालिकेला नवजीवन मिळाल्याची प्रेरणादायी घटना मोहुर्ली गावात घडली आहे. घरात प्रसूती झाल्यानंतर केवळ २ किलो वजन असलेल्या बालिकेचे वजन अवघ्या दोन दिवसांत धोकादायकरीत्या १ किलो ४०० ग्रॅमपर्यंत घसरले होते. मात्र आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि योग्य समुपदेशनामुळे आज ती बालिका पूर्णपणे धोक्याबाहेर असून तिचे वजन तब्बल २ किलो ६५० ग्रॅमपर्यंत वाढले आहे.

तालुक्यातील मोहुर्ली गावातील २० वर्षीय पिंकी जाकेश मडावी यांची ही पहिलीच प्रसूती होती. दि. ८ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ५:४५ वाजता त्यांनी एका गोंडस कन्येला जन्म दिला. ही प्रसूती गावातील दाईमार्फत घरीच करण्यात आली. मात्र जन्मानंतर बालिकेचे वजन कमी असल्याने आरोग्य विभागासाठी ही बाब चिंतेची ठरली. त्यातच कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल होण्यास स्पष्ट नकार दिल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली.

पारंपारिक समजुतींमुळे जन्मानंतर लगेचच बालिकेला अंघोळ घालण्यात आली. तसेच नवजात बाळाला आवश्यक असलेले पुरेसे स्तनपानही देण्यात आले नाही. परिणामी, अवघ्या दोन दिवसांत बालिकेचे वजन तब्बल ६०० ग्रॅमने घटले. बाळाची प्रकृती गंभीर होत असल्याने दि. १० एप्रिल रोजी डॉ. राकेश नागोसे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरभेट देऊन तातडीने रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र कुटुंबीयांनी पुन्हा उपचारांसाठी नकार दिला.

अशा बिकट परिस्थितीतही आरोग्य विभागाने हार मानली नाही. आरोग्य सेविका श्रीमती दुर्वा, श्रीमती उसेंडी, आरोग्य सेवक श्री. राणा, गटप्रवर्तक श्रीमती गादेवार, अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांनी एकत्र येत घरालाच छोटेखानी ‘रुग्णालय’ बनवले. आशा कार्यकर्त्यांकडून दिवसातून तीन वेळा भेटी देण्यात येत होत्या, तर आरोग्य कर्मचारी दररोज गृहभेट घेऊन आई व कुटुंबीयांचे समुपदेशन करत होते.

या काळात मातेला KMC म्हणजेच ‘कांगारू मदर केअर’चे महत्त्व समजावून सांगण्यात आले. बाळाला सतत उबदार ठेवणे, निव्वळ स्तनपान देणे आणि योग्य काळजी घेणे याबाबत प्रत्यक्ष कृतीतून मार्गदर्शन करण्यात आले. बाळाला अंघोळ घालणे थांबवून आईच्या मायेच्या उबेने त्याचे संरक्षण करण्यात आले.

आरोग्य पथकाच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले. हळूहळू मातेचा प्रतिसाद सकारात्मक होत गेला आणि उपचारांविषयी विश्वास निर्माण झाला. दि. १४ मे २०२६ रोजी एका महिन्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर त्या चिमुकलीचे वजन २ किलो ६५० ग्रॅमपर्यंत पोहोचले. आज ती बालिका पूर्णपणे सुदृढ असून धोक्याबाहेर आहे.

“जेव्हा कुटुंबीयांनी उपचारांना नकार दिला, तेव्हा आम्ही हार मानली नाही. आईच्या मनात विश्वास निर्माण केला आणि आज ते बाळ निरोगी पाहून आमच्या मेहनतीचे चीज झाल्याची भावना आहे,” अशी प्रतिक्रिया मोहुर्ली येथील आरोग्य पथकाने व्यक्त केली.

ही घटना केवळ एका बालिकेच्या वजनवाढीची कथा नसून आरोग्य कर्मचाऱ्यांची निष्ठा, आईची माया आणि योग्य आरोग्य सेवेमुळे नवजात बालकाचे जीवन कसे वाचू शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.